नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेत गैरकारभार होत असल्याचा आरोप करत सीजेपीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर दिल्लीत सुरु झालेल्या आंदोलनाने व्यापक स्वरुप घेतले आहे. परंतु प्रधान राजीनामा देणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या धरणं आंदोलनाची पूर्वकल्पना न मिळणं, ही चूक झाल्याचंही मान्य करण्यात आलं.
धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, हे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी दोन त्रुटी मान्य करण्यात आल्या, पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेस पक्षाने केलेल्या धरणे आंदोलनाची पूर्वकल्पना न मिळणे आणि जंतरमंतरवरील गर्दीचा अंदाज घेण्यात झालेली चूक. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
भाजपची हायव्होल्टेज बैठक
दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या पाचव्या मजल्यावर २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पक्षाचे आठ सरचिटणीस एकत्र आले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत नेत्यांसह अनेक पदाधिकारीही तिथे पोहोचले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांमुळे निर्माण झालेली परिस्थिती हा मुख्य विषय होता.
हे आंदोलन महिनाभरापासून सुरु असूनही पक्षाच्या कार्यालयात पहिल्यांदाच शॉर्ट नोटीसवर त्याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तास चाललेल्या या बैठकीत आंदोलनाचा प्रभाव निष्प्रभ करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही स्तरांवर त्याला प्रत्युत्तर देण्याची योजना आखण्यात आली.
बैठकीदरम्यानच देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक मेसेज पाठवून हे आंदोलन आणि राहुल गांधींविरोधात प्रभावी व कल्पक स्लोगन तयार करण्याबाबत विचारमंथन करण्यास सांगण्यात आले. या आंदोलनामुळे पक्षात वातावरण चांगलेच गरम झाले आहे.
नितिन नवीन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले की, हा विषय गुंतागुंतीचा असला तरी त्याचे निराकरण करुन तो तीन ते चार दिवसांत मार्गी लावणे आवश्यक आहे. सरकारविरोधातील जनभावना आणि विरोधी पक्षाचा आक्रमक पवित्रा यांचा सामना करणे गरजेचे आहे; तसेच त्याला प्रत्युत्तर देणारे एक काउंटर-नॅरेटिव्ह तयार करणेही अनिवार्य आहे.
भाजपच्या बैठकीत कोणते मुद्दे ठरले?
१. काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले, जे संविधानाचे उल्लंघन करणारे कृत्य होते. याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करतील. यावेळी ते ङ्गङ्घपंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉलशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाहीङ्घङ्घ अशा आशयाची घोषणाबाजी करतील.
२. या संघटनेच्या विविध आघाड्या युवा, महिला आणि शेतकरी आघाड्यादेशभरात रॅली आणि आंदोलने आयोजित करतील. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण करण्याचा प्रयत्न, हे यातील मुख्य मुद्दे असतील. हे आंदोलन अराजकतावादी घटकांच्या हातात होते, हा मेसेज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील.